स्वर्गीय इंदिरा गांधी
आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, गुरुजनवर्ग आणि माझे सर्व मित्र मैत्रिणींनो, आज 31 ऑक्टोबर, श्रीमती इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन म्हणजेच त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जमलेलो आहोत.
राजकीय क्षेत्रात अलीकडच्या काळात ज्या महिलांनी श्रेष्ठ कामगिरी बजावली, त्यांच्या यादीतले महत्त्वाचे नाव म्हणजे स्वर्गीय इंदिरा गांधी-भारताच्या भूतपूर्व पंतप्रधान.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांची प्रिय कन्या म्हणजेच प्रियदर्शनी इंदिरा. आपले आजोबा मोतीलाल नेहरू यांच्या मांडीवर बसून न्यायनिवाडे ऐकणाऱ्या इंदिराने आपल्या चौकस बुद्धीने अनेक गोष्टींचे निरीक्षण केले होते. शिवाय वडिलांचे मार्गदर्शन होतेच.
आपल्या अंगच्या गुणांमुळे हळूहळू राजकारणात प्रवेश करीत पुढे आलेल्या इंदिराजी 1966 साली भारतासारख्या खंडप्राय देशाच्या पंतप्रधान झाल्या. सारे जग चकित झाले होते. अनेक समस्यांनी ग्रस्त असलेला भारत आणि अशा देशाचा कारभार एका महिलेकडे? अनेक दिग्गज नेते काँग्रेसमध्ये असतानाही हे घडले! याचे कारण एकच होते इंदिराजींचे अष्टावधानी, धाडसी, करारी व्यक्तिमत्व आणि अचूक निर्णय शक्ती. 1971 च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी त्यांच्या राजकारण कौशल्याची खरी परीक्षा झाली. बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळून देऊन त्यांनी भारताची कीर्ती वाढविली. जगात भारताच्या भूमिकेचे कौतुक झाले. त्यातून इंदिराजींच्या निर्णयशक्तीचे दर्शनही जगास घडले. आणीबाणीच्या कालखंडानंतर जनतेने दिलेला कौल स्वीकारून त्या सत्तेवरून दूर झाल्या; पण पुन्हा जनतेचा विश्वास संपादन करून त्या देशाच्या नेत्या बनल्या. राष्ट्राच्या अखंडतेसाठी त्यांनी अतिरेक्यांविरुद्ध कठोर कारवाई केली आणि याचाच परिणाम म्हणून 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांची हत्या झाली.
सारा भारत देश शोकाकुल झाला; एवढेच नव्हे, तर एका मुत्सद्दी नेतृत्वाला गमावून बसल्याचे दुःख साऱ्या जगाने व्यक्त केले. भारतीय नारी शक्तीचे राजकारणात धुरंधर दर्शन घडविणाऱ्या त्यांच्या स्मृतीस माझे विनम्र अभिवादन.
तात्पर्य: इंदिराजींनी साऱ्या जगाला भारतीय नारी शक्तीचे तसेच तिच्या राजकारणातील धुरंधर शक्तीचे दर्शन घडविले
|| जय हिंद ||
महत्वाचे: तर मित्रांनो, “इंदिरा गांधी | छोट्यांची छोटी भाषणं” हे मराठी भाषण आवडले असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका. या भाषणाबद्दल काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – grammargurujistudy@gmail.com
वरील भाषणामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete