राणी लक्ष्मीबाई
आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, गुरुजनवर्ग आणि माझे सर्व मित्र मैत्रिणींनो, आज 18 जून, झाशीच्या राणीचा स्मृतिदिन म्हणजेच त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जमलेलो आहोत.
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या, संगणकाच्या युगात स्त्री ही उच्चशिक्षित आहे. तरीही पुरुषप्रधान संस्कृतीमुळे आजही आधुनिक स्त्रीला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालेले दिसत नाही. मात्र झाशीची राणी ही १९ व्या शतकातील वैधव्य प्राप्त झालेली स्त्री असूनही त्या सौदामिनीने आत्मविश्र्वासाने, स्वकर्तृत्वाने, चातुर्याने, पराक्रमाने, स्वाभिमानासह, स्वराज्यासाठी इंग्रजांशी असामान्य असा लढा दिला. आपल्या पराक्रमाचा ठसा पूर्ण जगाच्या इतिहासावर उमटविला.
आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. अशातीलच एक म्हणजे झाशीची राणी. 'मेरी झांसी नहीं दूंगी' असे म्हणत ब्रिटिशांशी लढणारी, लढता-लढता मरणारी ही थोर पराक्रमी स्त्री म्हणजे भारत मातेची पराक्रमी आदर्श कन्या होती. १८ जून हा झाशीच्या राणीचा स्मृतिदिन. तिचे नाव राणी लक्ष्मीबाई. लहानपणी तिला कौतुकाने 'मनू' म्हणत. महाराष्ट्रातील मोरोपंत तांबे यांची ती कन्या. लहानपणापासून ती हुशार, चौकस, धाडसी होती. मोरोपंत बेठूर येथे पेशव्यांच्या सेवेत होते. त्यामुळे लढाई, शस्त्रास्त्रे, दरबार अशा शब्दांशी मनुची खूप जवळीक होती.
असाच एक प्रसंग घडला. रावसाहेब व नानासाहेब पेशवे हत्तीवरून फेरी मारायला निघाले होते. मनुनेही त्यांच्याबरोबर जावे, असे बाजीरावांना वाटले, पण नानांनी माहुताला संकेत करून हत्ती पुढे नेला. नानाही लहान मनुही लहान; पण मनूला या गोष्टीचा राग आला. ती हिरमुसली. मोरोपंत म्हणाले, 'मनू, हत्तीवर फिरायला आपण राजे का आहोत? जे आपल्या भाग्यात नसते त्याची इच्छा का धरावी?'
त्यावर म्हणून ताडकन म्हणाली, 'माझ्या नशिबात एकच काय, अनेक हत्ती आहेत.' मोरोपंत म्हणाले, 'बरं असेच होवो.' पण मनातून त्यांना खूप वाईट वाटले. मनू म्हणाली, 'मी आता बंदूक चालवायलाही शिकणार आहे.' आणि घडलेही तसेच. मनू सर्व शस्त्रास्रे, युद्धकला, घोड्यावर बसणे असे शिकली. मोठेपणी तिचे लग्न झाशी संस्थांनचे महाराज गंगाधरराव यांच्याशी झाले. मनू आता राणी लक्ष्मीबाई झाली. प्रत्यक्षात अनेक हत्ती-घोड्यांची मालकीण झाली; पण दुर्दैवाने गंगाधररावांचा मृत्यू लवकर झाला. पुढे ब्रिटिशांच्या जाचातून देश सोडविण्यासाठी काहींनी लढा द्यायचे ठरवले. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे अग्रणी होते. त्यावेळी झाशीला राजा नव्हता, पण राणी लक्ष्मीबाईने स्वतः युद्धाचा निर्णय घेतला आणि ब्रिटिशांशी युद्ध केले. इंग्रज अधिकारी ह्यू रोज याच्या सैन्याशी राणीने चांगलीच लढत दिली. रणांगणात ती विजेप्रमाणे लखलखत होती. अखेर लढता-लढताच तिला मरण आले. पण जिवंत असेपर्यंत ती इंग्रजांना शरण गेली नाही. 'मेरी झांसी नहीं दुंगी' म्हणत राणी इतिहासात अमर झाली. आपणही तिच्यासारखी जिद्द, पराक्रम दाखवून मोठे होऊया.
तात्पर्य: मनात आणले तर आपण स्वकर्तुत्वाने इतिहास घडू शकतो हेच म्हणूनच सिद्ध केले.
|| जय हिंद ||
महत्वाचे: तर मित्रांनो, “झांसीची राणी | छोट्यांची छोटी भाषणं” हे मराठी भाषण आवडले असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका. या भाषणाबद्दल काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – grammargurujistudy@gmail.com
वरील भाषणामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.